GST Basics
#GSTBasics
२०१७ मध्ये GST कायदा लागू झाला. तेव्हापासून त्यात इतके बदल झाले, इतके circular, notification आले की CA नी गच्च भरलेल्या auditorium मधल्या सगळ्यांची बोटं ती मोजायला घेतली, तरी कमी पडतील! असे असून सुद्धा समाजात, खास करून व्यवसाय करणाऱ्यांमध्ये याबद्दलच्या basic गोष्टींबद्दलच अफाट गैरसमज आहेत. म्हणूनच GST तील क्लिष्ट किंवा न्यायप्रविष्ट गोष्टींबद्दल चर्चा न करता, अगदी मूळ गोष्टींची या लेखात मांडणी केली आहे. त्यामुळे बरेच लोक म्हणतील, "यात काय नवीन, हे तर आम्हाला माहीत आहे सगळं!"
१. GST calculation-
यात समजण्यास काहीच अवघड नाही. मी एखादी वस्तू १००० ला खरेदी केली व त्यावर १८% GST १८०/- इतका दिला. तीच वस्तू मी २००० ला विकली व त्यावर १८% ३६०/- माझ्या ग्राहकाकडून वसूल केला. तर मग सरकारला मी विक्रीवरील ३६० वजा खरेदीवरील १८० = १८० इतके देणे लागतो.
२. GST नोंदणी कधी करू?
काही विशिष्ट राज्य वगळून बऱ्याच राज्यात- तुम्ही जर फक्त खरेदी-विक्री किंवा उत्पादन क्षेत्रात असाल (म्हणजे फक्त goods) तर रु. ४० लाख वार्षिक उलाढाल होईपर्यंत व जर सेवा क्षेत्रात असाल किंवा वस्तू + सेवा अशा क्षेत्रात असाल तर रु.२० लाख वार्षिक उलाढाल होईपर्यंत GST नोंदणी बंधनकारक नाही. पण- कुठल्यातरी कंपनीची ऑर्डर मिळविण्यासाठी किंवा फक्त ऑनलाइन वेबसाईटवर विकण्यासाठी आम्ही GST नोंदणी केली- अशी स्वेच्छेने GST नोंदणी केली असेल (voluntary registration) तर मग फक्त त्याच ऑर्डरवर नव्हे, तर तुमच्या एकूण उलाढालीवर GST द्यावा लागेल.
३. पैसे saving खात्यात आले तर GST बसणार नाही!
हा एक कमालीचा गैरसमज आहे. एकदा GST नोंदणी केली की ती त्या व्यक्तीच्या PAN वर आधारित असते. यामुळे त्या व्यक्तीच्या saving, current, OD, CC कुठल्याही खात्यात वस्तू/ सेवेचे पैसे आले, इतकेच काय, वस्तूसमोर वस्तूचीच देवाणघेवाण केली, तरी GST भरावा लागेल.
४. GST नोंदणी केली, की सरकार आम्हाला GST refund देईल!
हा अजून एक गैरसमज! काही लोकांच्या मते GST नोंदीत व्यापाऱ्याने त्याच्या खरेदीवर जितका GST दिला आहे, तो सगळा त्याला परत केला जाईल! साधा विचार करा, असं असतं, तर सगळ्यांनीच GST नोंदणी केली नसती का? आणि आत्तापर्यंत सरकारचे दिवाळे निघाले नसते का? त्यामुळे साधे सरळ लक्षात ठेवा- GST नोंदणी केली, की प्रत्येक विक्रीवर ग्राहकाकडून त्या-त्या वस्तू/ सेवेच्या दराप्रमाणे GST वसूल करावाच लागेल. इथे तुम्ही शक्कल लढवाल- मी तर ग्राहकाकडून एकूण ११८/- घेतले, वेगळा GST लावलाच नाही. असे केल्यास तुम्हाला मिळालेली रक्कम ही GST धरून आहे, असे समजून १०० + GST १८ असे धरले जाईल, व १८/- सरकारला भरावे लागतील.
५. शिस्त
बेशिस्त व वेळेवर CA, टॅक्स Consultant यांना माहिती न पुरवणाऱ्या लोकांनी चुकून सुद्धा GST नोंदणी करू नये. इथे उशिरा रिटर्न भरणाऱ्यांना वारेमाप late fee व व्याजाची तरतूद आहे. वर पुन्हा ही सगळी आकारणी पोर्टल द्वारे automatic काढली जाते, म्हणून उगाचच तुमच्या CA ला, "बघा ऑफिसरला भेटून, काही चहापाणी वगैरे..." असली वाक्य चुकूनसुद्धा मनात आणू नये. काटेकोरपणे वेळेवर कागदपत्रे सादर करणार असाल, तरच GST नोंदणी करावी.
६. या महिन्यात धंदा झाला नाही
GST मध्ये धंदा झाला नाही, तरी रिटर्न दाखल करावेच लागते. त्यामुळे धंदा झाला नाही, ही बाब सुद्धा आठवणीने आपल्या CA ला वेळेत कळवावी. तसेच शून्य व्यवसायाचे रिटर्न दाखल करायला ही कष्ट लागतात- त्याची कशाला फी द्यायची, अशी हुज्जत घालू नये.
७. Composition scheme काय प्रकार आहे?
ज्या व्यक्तीकडील जवळपास सर्व ग्राहक हे GST नोंदीत नाहीत, त्यांच्या दृष्टीने ही scheme आहे. म्हणचे खरेदी-विक्रीची बेरीज-वजाबाकी करण्यापेक्षा सरळ विक्रीच्या १% (वस्तूंसाठी) किंवा ६% (सेवांसाठी) कर भरायचा. पण ही scheme निवडल्यास ग्राहकांकडून बिलात वेगळा कर वसूल करू शकत नाही. तसेच ऑनलाइन विक्री करायची असेल, तर ही scheme तुम्हाला उपलब्ध नाही. काही ग्राहकांना बिलात GST लावतो, आणि काहींना १%/ ६% असे ही करता येत नाही.
वर काही अगदी सामान्य मुद्द्यांबद्दल माहिती दिली आहे. ही माहिती कोणतेही कायदेशीर मत किंवा कायदेशीर सल्ला समजू नये. शंका असल्यास आपल्या CA शी चर्चा करून निर्णय घ्यावा.
- CA प्रतिक दामले
9822339714
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा