आर्थिक शिक्षण- मुलांसाठी

आता लवकरच मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतील. सुट्ट्यांचे नियोजन हे बरेच पालक आधीच करून ठेवतात. म्हणजे कुठले डोंगर चढायचे आणि कुठल्या दरीत उडी मारायची- हे सगळं ठरलेलं असतं! पण शाळेतल्या मुलांना, विशेषतः १२ ते १५ वय असलेल्यांना पैशाविषयी काही शिकवावे, असे फार कमी पालकांना वाटते. खास या वयोगटातील मुलांसाठी हा लेख!

कुठल्याही teenager ला एखादी गोष्ट समजावतांना त्यांचा पहिला प्रश्न असतो, "हे शिकून आम्हाला काय करायचंय?" तर लक्षात घ्या, मोठे होणे किंवा जबाबदार होणे, असे कोणाच्याही डोक्यामागे बटन नसते; की ते दाबले आणि मुलाचा माणूस झाला. आत्ता खिशात दमडी ही नसतांना या गोष्टी नीट शिकाव्यात- काय करावे, तसेच काय करू नये; म्हणजे जेव्हा पुढे जाऊन आयुष्यात पैसा हातात येईल, तेव्हा हे ज्ञान वापरता येईल. तसेच, या वयातील मुलांना त्यांना "लहान" म्हटलेलं अजिबात आवडत नाही. पैसा हाताळणे हा देखील "मोठे" होण्याचाच एक भाग आहे. म्हणून हे ज्ञान आवश्यक.

आयुष्यात सर्वात महत्त्वाचा प्रश्न- मी कोण आहे? काळजी नसावी- आपण अध्यात्माविषयी नाही, पैशाविषयीच बोलत आहोत. पैशाबद्दल विचार करतांना ही आधी स्वतःला ओळखणे महत्त्वाचे- मी काटकसर करणारा आहे, का उधळपट्टी करणारा? पॉकेट मनी मिळाला की दोन दिवसात खल्लास, की हे पैसे मला महिनाभर पुरवता येतात? गुंतवणूक म्हटलं की मी जोखीम उचलणारा आहे का? का इथे थोडीशी risk घेतली, की माझी रात्रीची झोप उडते- तर मग मी खरच share मार्केट इ. मध्ये गुंतवणूक करण्याच्या लायकीचा आहे का? तिथे ढीग पैसा मिळेल, पण माझी मनःशांती जाईल, त्याचं काय? हा स्वतःचा अभ्यास आधी करायला हवा. कुणीतरी महान गुंतवणूकदाराने अमुक वयात अमुक व्यवसायात उडी टाकली, आणि आज अब्जाधीश झाला- म्हणून मी पण डोळे मिटून अनुकरण करून उपयोग नाही. प्रत्येकाची आर्थिक, सामाजिक, त्या वेळची राजनैतिक परिस्थिती वेगवेगळी असते.

एक चांगली लावून घेण्यासारखी सवय म्हणजे स्वतःची खर्चाची डायरी लिहिणे. त्यात तुम्ही आई-वडिलांकडून काय काय मागण्या करता, त्याची नोंद करत जाणे. याचा उपयोग need versus want या analysis साठी करता येतो. एखादी गोष्ट मी मागतोय, त्याची खरच मला गरज आहे, की केवळ हट्ट करायचा म्हणून मी मागतोय? इथे स्पष्टपणे सांगतो- तुम्ही आवश्यक तितकेच मागा, आणि संन्यासी व्हा, असे कोणीही सांगत नाही. प्रसंगी हट्ट ही करावा, उधळपट्टी ही करावी- पण ती मर्यादेत!

आता मर्यादा म्हणजे काय? तुम्ही २ खोल्यात राहत असाल, आणि बंगल्यात राहत असाल- तर मर्यादा शब्दाचा अर्थ वेगळा असतो. यासाठी man hours analysis कामी येईल. एकदा तुमच्या आई- वडिलांच्या कामाच्या ठिकाणी जाऊन त्यांचे कष्ट स्वतःच्या डोळ्यांनी बघा. माझे आई- वडील रोज कष्ट करतात, आपल्या बॉसची बोलणी खातात, सगळं काही सहन करतात आणि पैसा कमावतात. पण सरासरी ते तासाला किती कमावतात? जर समजा याचे उत्तर ताशी रु. १५० असे आले, तर पुढच्या वेळी एखाद्या गोष्टीचा हट्ट करतांना, "३०० रु. चीच तर वस्तू मागतोय मी, त्यात काय एवढं?" असा विचार न करता, "मी मागतोय ती वस्तू म्हणजे माझ्या आई- वडिलांचे दोन तासांचे कष्ट आहेत!" असा आपोआप विचार बदलेल. मग लक्षात येईल, की त्यांच्या एकूण कष्टांपैकी किती तासांचे कष्ट शान-शौकी करण्यात मागावे- या मर्यादा आत्तापासून कळल्या की जेव्हा पुढे जाऊन तुम्ही नोकरीला लागाल, तेव्हा स्वतःच्या कष्टाची किंमत कशी करावी, हे ही लक्षात राहील.

सुट्टीच्या दिवसात शिकण्यासारखी आणखीन एक कला, म्हणजे वाटाघाटी करता येणे- Bargaining किंवा negotiating. म्हणजे फक्त बाजारात जाऊन घासाघीस करता येणे इतकेच नाही. उद्या तुम्ही नोकरीसाठी interview द्यायला जाल, तेव्हा आपली लायकी आहे, किमान तेवढा तरी पगार पदरात पाडून घेता यायला हवा. जर धंद्यात उतरलात, तर गिऱ्हाईकाकडून आपल्या वस्तूचा/ सेवेचा योग्य मोबदला काढून घेता आला पाहिजे. हे शिकण्यासाठी स्वतः काही करण्याआधी नियमितपणे आई- वडिलांबरोबर मंडई, किराणा दुकानात खरेदीला जा. आधी फक्त निरीक्षण करा- लोक कसे बोलतात, चेहऱ्यावर काय हावभाव असतो, घासाघीस करायची तर किती वेळ आणि कुठपर्यंत? हे आधी फक्त बघा. हळूहळू तुम्ही ही शिकत जाल. एखाद्यावेळी ८-१० वस्तूंची छोटीशी सामानाची यादी घेऊन जा आणि वस्तू तपासून पैसे हाताळायला ही शिका.

याच बरोबर स्वतःची किंमत पटवून देणे ही कला ही शिकायला हवी. मान्य आहे, की अंगी नम्रपणा असावा, वल्गना करू नये; पण अती नम्र सुद्धा असू नये.

आजच्या काळात समाजाला लागलेली सगळ्यात घातक कीड म्हणजे youtube आणि instagram वरचे influencers. या "लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण" लोकांपासून कटाक्षाने दूर रहा. उगीचच झटपट श्रीमंतीचे मार्ग, किंवा ४०व्या वर्षी निवृत्त कसे व्हावे, असल्या फालतू फंदात पडू नये. श्रीमंती इतकी सहज सोपी असती, तर ती सगळ्यांनीच मिळवली असती. म्हणून यशस्वी लोकांना प्रत्यक्ष भेटा, त्यांनी काय केलं, ते कसे आयुष्यात खचले, काय चढ-उतार त्यांनी बघितले, असे प्रश्न विचारा आणि त्यातून ज्ञान मिळवा.

स्वतःचे बँकेत खाते तर अवश्य उघडा आणि चालवा- म्हणजे नुसते मोबाईलवर नाही, तर प्रत्यक्ष बँकेत जाऊन! बँकेत प्रत्यक्ष जाऊन त्यांच्याशी बोला- काय गुंतवणूक करता येईल, काय काय चार्जेस पडतील याची बोलून माहिती घ्या. Investing मध्ये काम करणाऱ्या लोकांना भेटा, स्वतः research करा- टॅक्स किती बसतो, काय risk आहे, liquidity काय आहे-हे प्रत्येक गुंतवणूकीबद्दल जाणून घ्या. शाळेत चक्रवाढ व्याजाबद्दल नुसतं पुस्तकात वाचू नका- प्रत्यक्षात ते समजावून घ्या. तुम्ही जर १ कोटीचे कर्ज घेऊन घर विकत घेतलं, तर १५- २० वर्षात तुम्ही खरंतर २ कोटी फेडता. पण मनात १ कोटी हीच वस्तूची किंमत पकडली जाते. कर्जाची हीच गम्मत आहे! घेतांना मजा वाटते, पण वर्ष सरली की सत्य लक्षात येतं!

कर्जाचा विषय आलाच आहे, तर त्या बाबतीत महत्त्वाचं- घर आणि गाडी व्यतिरिक्त आयुष्यात इतर काही विकत घेण्यासाठी कोणतेच कर्ज घेऊ नये. याला तुम्ही old fashioned म्हटलं तरी चालेल, पण हे खूप महत्त्वाचे आहे. Buy now, pay later या जाहिरातींचा खरा अर्थ Enjoy now, suffer later असा असतो. कधीही कोणाला जामीन (guarantor) राहू नये. काही finance च्या पुस्तकात 20-10 नियम सांगितला जातो- घर आणि गाडी व्यतिरिक्त कर्ज घ्यायची वेळ आलीच, तर एकूण कर्ज हे तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या २०% पेक्षा अधिक नसावे आणि मासिक हफ्ता हा मासिक उत्पन्नाच्या १०% पेक्षा अधिक नसावा.

वर म्हटल्याप्रमाणे या influencer जमातीपासून दूर रहा. उत्पन्न वाढविण्याचा सगळ्यात चांगला मार्ग शिक्षणच आहे. "अरे, आत्ता अभ्यास कर, मग १० वी नंतर आराम आहे", "१२ वी नंतर लाईफ सेट आहे!", "लग्नानंतर सगळं काही टॉप होईल." असल्या वाक्यांना मनात घर करू देऊ नये. शिक्षण ही आजन्म चालू रहाणारी गोष्ट आहे. शिकत रहा, आणि आपली पातळी उंचावत रहा.

संयम शिकणे हा देखील शिक्षणाचाच एक भाग आहे. गुंतवणूक करतांना आज गुंतवले, पुढच्या महिन्यात डबल, असे कधी होत नाही. संयम ठेवता येत नसेल, तर या सुट्टीत एखादी कुंडी आणून त्यात एक रोपटे लावा, ते जगवा. आपोआप संयम शिकाल!

Depreciating आणि appreciating assets हे ही कळायला हवे. शान-शौकी, दिखावा यासाठी "भारीतली" किंवा "महागातली" वस्तू विकत घेतली जाते. पण या वस्तूंची किंमत भराभर उतरते- depreciating assets विकत घ्या, पण जोडीला appreciating assets ही हव्यात. कार विरुद्ध घर यातून हे सहज लक्षात येईल.

हे सगळं शिकतांना काही पुस्तकी वाक्य कानी पडतील- 

Money is root of all evil- हे जर खरे असते, तर सगळे गरीब लोक गुणी असते! सत्य तर हेच आहे-पैसाच अजून पैसा खेचतो. कर्जवाले आणि क्रेडिट कार्ड वाले ही तुमच्याकडे पैसे असतांनाच त्यांचे प्रॉडक्ट विकायला फोन करतात. पण या अशा विक्रेत्यांपासून सावधान! चक्रवाढ व्याज नुसते शालेय पुस्तकात न वाचता त्याचा खरा अनुभव क्रेडिट कार्ड वर गोष्टी विकत घेण्यातून येतो.

शेवटी सांगेन की गुंतवणूक इ. गोष्टीत आक्रमक राहिलेलं चालेल, पण लालची नसावे. पैशाच्या बाबतीत "कळावे, लोभ नसावा!"


- CA प्रतिक दामले

9822339714

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पगारदार व्यक्तींसाठी

Women's Day 2021

GST Basics