महाशिवरात्री
काही लोक शंकराकडे पाहून भांग प्यायला शिकली, काही चित्र-विचित्र केस करायला शिकली. काहींच्या मते, देव धर्म ही सगळी अंधश्रद्धा आहे, तर काही देवावर विश्वास ठेवतात, पण मुर्तीपुजनाला काही अर्थ नाही असे मानतात! या सगळ्यांना माझे कायम एक सांगणे असते- देव माना अथवा नको, त्याच्या वेशभूषा, रंगभूषा, कपडे इ. चे अनुकरण करा अथवा नको; पण त्यांच्या कथांमधून नेहमीच काही न काही शिकण्यासारखे असते- ते अवश्य शिका!
अशीच एक कथा आहे, श्री शनि महात्म्यामध्ये -मग शनि गेला शिवापाशीं ॥ म्हणें आतां येतो तुम्हांसी ॥ तंव शंभु म्हणे आम्हांसी ॥ काय करिसी येऊनियां ॥ ३२१ ॥
परी येशील तेव्हां सांगून येणें ॥ ऐसें उभयंता झाले बोलणें ॥ मग दुसरे दिवशीं शनिनें ॥ येतों म्हणोनि सुचविलें ॥ ३२२ ॥
शंकरे ऐकोनि वचनासी ॥ क्षण एक लपला कैलासी ॥ मग वदता झाला शनिसी ॥ तुवां आमुचें काय केलें ॥ ३२३ ॥
मग शनि म्हणे महादेवा ॥ तुमचा धाक त्रिभुवनीं सर्वा ॥ मजभेणें लपलती देवाधिदेवा ॥ हे काय थोडे असे ॥ ३२४॥
ऐकोनि हास्य करी कैलासराज ॥ म्हणे धन्य तुझें उग्र तेज ॥ मग कृपा करोनी सहज ॥ आज्ञा देत शनीला ॥ ३२५ ॥
कथा- साडेसाती म्हणून येणारे शनी महाराज एकदा शंकरापाशी गेले, आणि "आता मी तुमच्या राशीला येतो", असे शंकराला सांगितले. शंकराने शनीला विचारले की साडेसातीत लोकांची संपत्ती जाते, नातलग दुरावतात इ. पण मी तर इथे कैलास पर्वतात बसलोय. गळ्यात मुंडक्यांची माळ आहे, अंगाला भस्म लावलंय, आणि ध्यान लावून बसलोय. न मला पैशाचा मोह, न मला एकांताचे दुःख! माझ्या वाट्याला येऊन काय करणार? तरी ठीक आहे, तू तुझे कर्म आहे, ते कर! दुसऱ्या दिवशी साडेसाती म्हणून शनी महाराज आले. शंकराने विचार केला- मला असं ही ध्यान लावूनच बसायचय, मग इथे काय आणि कैलास पर्वतात लपून बसलो तरी काय? म्हणून शंकर थेट साडेसात वर्ष कैलास पर्वतात लपून बसले! साडेसात वर्षांनंतर शनी महाराजांना विचारले- तुम्ही साडेसाती म्हणून आलात, काय उपयोग झाला? शनी महाराज म्हणाले- तुम्हाला तिन्ही लोक घाबरतात, तरी तुम्ही साडेसातीमुळे लपून बसलात, हे काय कमी आहे? हे ऐकून कैलासराज ही हसू लागले!
आता ही कथा नुसतीच कथा म्हणून न वाचता त्यातून बोध घ्यायला हवा-
आपण तिन्ही लोकांचे देव असलो, तरी वाईट काळ आपल्याला येणार आहेच- ही मानसिक तयारी हवी!
काळ वाईट असला तरी आपले कर्म नित्यनियमाने चालूच ठेवायला हवे- साडेसाती आली तरी शंकराने ध्यान सोडले नाही- उलट आपला focus अजून कसा वाढेल यासाठी प्रयत्न केले!
शनीने ही त्यातल्या त्यात आपण काय चमत्कार केला हे सांगितले- सगळ्यातले positive बघायला शिका! आणि client समोर तसे result present करता आले पाहिजेत!
थोडक्यात या कथेसारखे तुमच्या व्यवसायाचे ही आहे- चढ- उतार येणारच- तुम्ही तुमचे प्रयत्न तसेच अविरत चालू ठेवलेत, तर संकटे तुमचे काही वाकडे करू शकत नाहीत. उलट तुम्हीही शेवटी शंकरासारखे हास्य कराल!
Correct Pratik sir
उत्तर द्याहटवाआपण आपल्या लोकांना पुढे नेले पाहिजे
उत्तर द्याहटवा