डिप्रेशन

 ही post डिप्रेशन बद्दल आहे. 


टायटल वाचूनच काहींनी लगेच, "हे आपल्या कामाचं नाही", "हे विदेशी फॅड आहे", "आमचे मन खंबीर आहे, आम्हाला नाही येत डिप्रेशन" वगैरे प्रतिक्रिया दिल्या असतील. पण कोणी कितीही नाकारलं, तरी केवळ लोकडाऊन मधलाच नाही, तर डिप्रेशन हा कायमचाच खरा मानसिक आजार आहे. लोकडाऊन मध्ये घरात बसून काही लोक अजूनच डिप्रेशन मध्ये जाऊन आत्महत्येपर्यंत पोहोचले. फक्त नट-नट्या नाही, तर सामान्य लोक देखील. पण अनेकदा फक्त लोक काय म्हणतील, आपल्याला कमजोर समजतील का?, असे विचार मनात येऊन आपण आपल्याला किंवा आपल्या जवळच्यांना डिप्रेशन आले आहे, हे मान्य करायला तयार नसतो. *डिप्रेशन येणे हे नॉर्मल आहे* , हे आधी सगळ्यांना शिकवलं गेलं पाहिजे.

मी सुरुवातीलाच उघडपणे मान्य करतो, आयुष्यात एका क्षणी मला ही डिप्रेशन आले होते आणि आधी मला ही लोक काय म्हणतील हाच विचार आला होता. पण कालांतराने जवळच्या लोकांच्या संवादातून परिस्थिती सुधारली. सुदैवाने आत्महत्या वगैरे विचारापर्यंत मजल गेली नाही. पण आजही असे कित्येक लोक आहेत, जे "डिप्रेशन वगैरे काही नसतं, सगळे मनाचे खेळ आहेत, नाटकं आहेत" असे मानतात आणि मानसोपचार तज्ज्ञांकडे जाणे सोडाच, ते स्वतःच्या जवळच्या लोकांशीही संवाद साधत नाहीत. अशीच कोंडी झालेल्या लोकांसाठी ही post आहे. ज्या काही technique मला उपयोगी पडल्या, त्या इथे देत आहे. मी कोणी या विषयातील तज्ज्ञ नाही. पण हे फक्त अनुभवाचे बोल. या गोष्टी मला फायद्याच्या ठरल्या, तुम्हाला उपयोगी ठरतात का बघा-


I am enough मंत्र- बहुतेक वेळा आपण आपले आयुष्य दुसऱ्यांना impress करायला जगतो. त्याला काय वाटेल, तो/ ती काय म्हणेल इ. इतके प्रयत्न करूनही ती व्यक्ती आपल्यावर खुश नाही, मग मी काय कामाचा किंवा माझी जगात शून्य किंमत आहे हा न्यूनगंड मनात तयार होऊ लागतो. अशा वेळी डोळे मिटून एका जागी स्वस्थ बसावे आणि स्वतःला सांगावे- I am enough. मी जसा आहे, जो काही आहे, तो पुरेसा आहे. अमुक व्यक्ती मला बोलते, वाईट ठरवते, त्याचे मत परिवर्तन करण्याचा मी प्रयत्न केला. त्याचे मत बदलले नाही, हे ठीक आहे.

असे म्हटल्याने problem संपतो का? नक्कीच नाही. पण डिप्रेशन मधल्या व्यक्तीला निदान स्वतः बद्दल तरी बरं वाटतं. स्वतःचा द्वेष करणे तरी तो थांबवतो, किंवा ती भावना कमी होते.


दुसऱ्यांना मदत करणे- स्वतःचे दुःख विसरायला ही पद्धत सुद्धा उपयोगी पडते. तुमच्या आयुष्यात कष्ट आहेत, हाल आहेत? दुसऱ्यांच्या व्यथा ऐकल्यात तर कळेल, सगळ्यांनाच त्रास आहेत, कदाचित तुमच्याहून जास्त. त्यांना मदत करा. काहींचा माणुसकीवरचा विश्वास उडालेला असतो, तुम्ही मुक्या प्राण्यांची सेवा करा. याने सगळं ठीक होईल? अजिबात नाही! पण आपल्या मनात जी भावना होती, "मी कुचकामी आहे, माझा जगाला काही उपयोग नाही" ही भावना मदत केलेल्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर उमटणारे हास्य/ त्या कुत्र्याची शेपूट हलवणे/ त्या मांजरीने तुमच्या पायावर अंग घासणे यामुळे ती भावना कमी करायला नक्कीच मदत होते.


या गोष्टी मानसोपचाराला पर्याय नाहीत. जर मानसोपचार आवश्यक असेल, तर तो नक्कीच करायला हवा. मानसोपचार/ therapy मध्ये जातो, म्हणजे व्यक्ती वेडी- हा समज आधी नाहीसा करायला हवा. आयुर्वेदात देखील "सत्ववजय" (Psycho therapy) याचा उल्लेख केलेला आहे. आयुष्य हे शरीर (Body), इंद्रिये (Senses), सत्व (Mind) आणि आत्मा (Soul) या चारही घटकांपासून बनले आहे, असा तिथे उल्लेख आढळतो. यातल्या सत्व mind याच्या आरोग्याला ही महत्व दिले आहे.


आता बघू डिप्रेशनचे टोक- आत्महत्या. वर दिलेल्या गोष्टी आत्महत्या करणाऱ्याला ही तितक्याच फायद्याच्या ठरतात. पण त्याहून फायद्याचा ठरतो तो संवाद! इथे ज्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, त्याच्या जवळचे लोक चित्रात येतात.

प्रथम, माझ्या मुलाने/ मुलीने/ नवऱ्याने/ बायकोने हे पाऊल उचलले हा माझा दोष आहे का? असले विचार अजिबात करू नये. त्यांना सर्दी, खोकला, ताप आल्यावर आपण स्वतःला दोष देत बसतो का? नाही ना? त्या आजाराचे औषध आपण देतो आणि आजारी माणसाची काळजी घेतो. शारीरिक आजारासारखा मानसिक आजार हा एक आजार आहे हे आधी मान्य करावे.

दुसरं- ज्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, त्याने काही एका मिनिटात हा निर्णय घेतला नव्हता. त्यामुळे तुम्ही देखील "आत्ताच माझ्याशी बोल, मला सांग तुला काय दुःख आहे," असं 5 मिनिटात त्या व्यक्तीला बरे करण्यामागे लागू नये.  त्या क्षणी ती व्यक्ती स्वतःचा जितका द्वेष करते, तितका कोणीही करत नसेल. त्यांना "सांग काय चाललंय" असे सारखं विचारून अजूनच त्रास होऊ शकतो. त्याला वेळ द्या, हळू हळू मोकळे होऊ द्या. गरज लागली तर मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्या. त्यात लाज किंवा संकोच बाळगू नका. त्या व्यक्तीने जर आत्महत्या केली, तरी लोक बोलणारच आहेत, त्यामुळे लोक काय म्हणतील हा विचार आधी मनातून काढून टाका.


मी पुन्हा सांगेन, मी कोणी या विषयातील तज्ज्ञ नाही. तरी आशा आहे, आपणास हे फायद्याचे ठरेल. पण प्रत्येकाचे त्रास वेगळे असतात. One cloth fits all- एकच मात्रा सगळ्यांना लागू पडते, असे होऊ शकत नाही. पण निदान डिप्रेशन सुद्धा एक आजार आहे, हे जरी समाज म्हणून आपण मान्य करायला शिकलो, तर ती एक प्रगती ठरेल!


CA प्रतिक दामले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Job change Taxation

पगारदार व्यक्तींसाठी